वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर झाल्या. यावेळी कोकिसरे जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेल्या भाजप पक्षाच्या नवनिर्वाचित जि. प. सदस्या श्रावणी रोहन रावराणे यांची नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य या महत्वाच्या विषय समितीच्या सदस्य पदी निवड झाली असून त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचावण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून जिल्ह्यातील शिक्षण व आरोग्य व्यवस्थेला ऊर्जितावस्था देणार असून १५ मार्च २०२४ ची अन्यायकारक संचमान्यता, दुर्गम भागातील मराठी माध्यमाच्या शाळांच्या पट संख्येचा निकष शिथिल करणे, शुन्य शिक्षकी शाळा, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, अशैक्षणिक कामांचा असलेला बोजा, प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा कल वाढावा यासाठी जि. प. शाळांच्या इमारतींना नवसंजीवनी देवून तेथे तंत्रज्ञान व आय. सी. टी. चा वापर असे विविध शिक्षण व्यवस्थेतील प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्ह्यातील आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचारी वर्गाची कमतरता, अपुऱ्या साधनसामग्री व सुविधेमुळे होणारी रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भरीव निधीची तरतूद पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आरोग्य विषयक शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांना मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहे, गावागावांत महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.












