सावंतवाडीत सायबर भामट्यांचा कहर ! बनावट गॅस कंपनीच्या फोनने महिलेला १.८५ लाखांचा गंडा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरात पुन्हा एकदा सायबर गुन्हेगारांनी आपला डाव साधला आहे. सर्वोदय नगर येथील एका महिलेला बनावट फोन कॉलच्या माध्यमातून तब्बल १ लाख ८५ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला असून, या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास संबंधित महिलेला महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. गॅस कनेक्शन अपडेट किंवा बिल संदर्भातील काही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना मोबाईलवर काही स्टेप्स फॉलो करण्यास सांगण्यात आले.

विश्वास ठेवून महिलेनं मोबाईलवर आलेली लिंक उघडली आणि काही माहिती ‘स्वाईप’ केली. मात्र, हाच क्षण सायबर भामट्यांसाठी सुवर्णसंधी ठरला. काही क्षणांतच त्यांच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख ८५ हजार रुपये डेबिट झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेनं तात्काळ याबाबत माहिती दिली. या घटनेनंतर सावंतवाडी नगरपालिकेचे सभापती प्रतीक बांदेकर यांनी नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, कोणतीही अधिकृत गॅस कंपनी अशा प्रकारे फोन करून वैयक्तिक माहिती किंवा OTP मागत नाही. सायबर गुन्हेगार आता थेट तुमच्या घरात घुसत नाहीत… ते तुमच्या मोबाईलमधूनच तुमचं बँक खाते साफ करत आहेत !

“एक क्लिक… आणि खाते रिकामं!” हीच आजची भीषण वास्तवता आहे.

  • सावधानतेचा इशारा: *

अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलवर विश्वास ठेवू नका

कोणतीही लिंक, अप किंवा OTP शेअर करू नका. बँक किंवा कंपनीच्या नावाखाली येणाऱ्या कॉलची खातरजमा करा.

नागरिकांनी जागरूक राहणं हाच सायबर गुन्ह्यांपासून बचावाचा एकमेव मार्ग आहे!