एसटीचा प्रवास महागला..!

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांना भाडेवाढीचा ‘जोर का धक्का.. धीरे से’ देण्याचा प्रयत्न केला आहे. उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी परिवर्तनशील भाडेवाढ लागू केली असून ती १५ एप्रिल ते १५ जूनसाठी लागू केली आहे. याचसोबत आता प्रत्येक तिकीटावर दोन रुपये स्वच्छता अधिभारही लागू करण्यात येणार असून हा अधिभार मात्र कायमस्वरूपी असणार आहे. याचीही अंमलबजावणी १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच १५ एप्रिलपासून करण्यात येणार आहे.

दोन महिन्यांसाठी हंगामी भाडेवाढ

उन्हाळी हंगामासाठी लागू करण्यात आलेली परिवर्तनशील भाडेवाढ ही साधी, जलद व रात्रसेवा या बससाठी आहे. सदरची दहा टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने २००६ मधील सुधारणेनुसार यात्रा, सणासुदीचा काळ, सुट्ट्या, सप्ताह, गर्दी हंगाम, आदी कालावधीसाठी ३० टक्केपर्यंत भाडेवाढ करण्यास मान्यता दिली आहे. या अंतर्गत दहा टक्के भाडेवाढ या उन्हाळी हंगामासाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात साधा बससेवेचा प्रकार वगळता निमआराम, वातानुकूलित शयनआसनी, वातानुकूलित शयनयान, शिवशाही, जनशिवनेरी, शिवनेरी, ई-बस या बससेवा प्रकारात उन्हाळी गर्दी हंगाम कालावधीत कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. १५ एप्रिल, २०२६ पासून म्हणजेच १४ एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर ही भाडेवाढ अमलात येणार आहे. विशेष म्हणजे, ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केलेले असेल, अशा प्रवाशांकडून आरक्षण तिकिटाचा जुना दर व नवीन दरातील फरक वाहकाने वसूल करावयाचा आहे. १६ जून, २०२६ पर्यंत ही भाडेवाढ लागू असणार आहे. ‘आवडेल तेथे कुठेही प्रवास’ योजनेचे दर यापूर्वी निश्चित करण्यात आले असून त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. विशेष बससेवेसाठीही जुनेच दर लागू असून ही परिवर्तनशील भाडेवाढ मासिक, त्रैमासिक पासेस व विद्यार्थी पास योजना लागू होणार नाही.

प्रत्येक प्रवाशाकडून २ रु. स्वच्छता अधिभार होणार वसूल

दरम्यान, एकीकडे ही परिवर्तनशील भाडेवाढ लागू करतानाच दुसरीकडे रा.प. महामंडळाने प्रवासी तिकिटावर दोन रुपये स्वच्छता अधिभार लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांना नियमित वेळेत बस उपलब्ध करून देण्याबरोबरच मार्गावर देण्यात आलेली बस आतून व बाहेरून स्वच्छ असणे, बसस्थानक परिसर व प्रवासी प्रतीक्षालय स्वच्छ असणे आवश्यक आहे. यासाठी महामंडळाकडे सफाई कामगारांची कमतरता असल्याने स्थानिक पातळीवर कंत्राटी पद्धतीने स्वच्छता करून घेण्यात येते. परंतु ही स्वच्छता अपेक्षेप्रमाणे दर्जेदार होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आता प्रवाशांकडूनच पैसे वसूल करून ही स्वच्छता करण्यात येणार आहे. महामंडळाची राज्यभरात २५१ आगार व ५९८ बस स्थानक आहेत. दैनंदिन ५५ लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येते. प्रवाशांची वाहतूक करताना त्यांना स्वच्छ बसेस उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर स्वच्छ बसस्थानक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महामंडळाने हा निर्णय घेतला असल्याचे महामंडळाने म्हटले आहे. यात १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून म्हणजे १५ एप्रिल २०२६ पासून प्रवासी भाड्यात स्वच्छता अधिभाराची आकारणी करण्यात येणार आहे. त्यात प्रति प्रवासी दोन रुपये याप्रमाणे शुल्क आकारण्यात येणार आहे. १५ एप्रिलपासून प्रवास सुरू करणाऱ्या सर्व प्रवाशांना तिकीट देतेवेळी प्रती प्रवासी दोन रुपये स्वच्छता अधिभार वसूल करून तिकीट देण्यात यावे. स्वच्छता अधिभारांतर्गत जमा होणाऱ्या रकमेवर प्रवासी कर आकारण्यात येऊ नये, असेही महामंडळाने म्हटले आहे.

हंगामी भाडेवाढ व स्वच्छता अधिभारानंतर काही प्रमुख मार्गावरील वाढणारे तिकीट दर

१) कुडाळ – कणकवली जुनादर ७१ रु. नवीनदर ८०रु.

२) कणकवली – मालवण जुनादर ८१रु. नवीनदर ९१ रु.

३) कणकवली – सावंतवाडी जुनादर १०२ नवीनदर ११४रु.

४) कणकवली – देवगड जुनादर ९१रु. नविनदर १०२रु.

५) कणकवली – कोल्हापूर जुनादर १९२ रु. नवीनदर २१३रु.

६) कणकवली – रत्नागिरी जुनादर २२२ रु. नवीनदर २४६ रु.

७) कणकवली – पुणे नवीनदर ५९४ रु. नवीनदर ६५५रु.

८) कणकवली – बोरिवली जुनादर ८०५रु. नवीन दर ८८७रु.

हंगामी भाडेवाढ ही दोन महिन्यांसाठी

सदरची हंगामी भाडेवाढ ही दोन महिन्यांसाठी आहे. मात्र, त्यानंतर प्रत्येकी तिकीटावरील स्वच्छता अधिभार कायम राहणार आहे. त्यामुळे त्यानंतरच्या कालावधीत सर्व प्रकारच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सध्याच्या तिकीट दरापेक्षा दोन रुपये जादा द्यावे लागणार आहेत. उदा. द्यायचे तर सध्या कणकवलीहून कुडाळसाठी ७१ रुपये तिकीट असून ते १५ जूननंतर ७३ रुपये होणार आहे. तसेच या स्वच्छता अधिभारामुळे महामंडळाकडून प्रत्येक तिकीटावर एकूण तीन रुपये आकारले जाणार आहेत. यापुर्वीच्या पद्धतीनुसार अपघात सहाय्यता निधी म्हणून एक रुपया आकारणी केली जात असून आता हे दोन रुपये आकारण्यात येणार आहेत.