देवगड (प्रतिनिधी) : शिक्षण विकास मंडळ देवगड संचलित श्री शांताराम कृष्णाजी पंत वालावलकर अध्यापक महाविद्यालय, देवगड यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी सविता आश्रम, पणदूर येथे निराधार व्यक्तींच्या सानिध्यात सामाजिक उपक्रमांद्वारे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी आश्रमाचे प्रमुख संदीप परब यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. भालचंद्र भाऊ मुंबरकर यांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांकडून संकलित करण्यात आलेले अन्नधान्य, कपडे तसेच आर्थिक मदत आश्रमाच्या प्रमुखांकडे सुपूर्द केली. यानंतर उदय परब यांनी आश्रमातील कार्याचा आढावा घेत तेथील रहिवाशांची माहिती उपस्थितांना दिली व समाजातील नागरिकांनी अशा संस्थांना सहकार्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. आश्रमातील बांधवांसाठी भाजीपाला निर्मिती प्रकल्पाबाबत उदय कामत यांनी मार्गदर्शन केले, तर शेतीविषयक नियोजन व मधुमक्षिका पालन या विषयांवर नारायण चेंदवनकर यांनी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्राचार्य प्रा. भालचंद्र भाऊ मुंबरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रकाश टाकत सामाजिक समतेचा संदेश दिला. उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापकांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजसेवेची प्रेरणा जोपासण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमास प्राचार्य प्रा. भालचंद्र भाऊ मुंबरकर, ग्रंथपाल ललिता श्रीराम आजरेकर तसेच प्रथम व द्वितीय वर्षातील प्रज्वल हिंदळेकर, मानसी पाटील, मानसी करंदीकर, सुजित फडके, मंदार वाडेकर, मानसी पार्टे, वर्षा मेस्त्री, शितल मर्गज, संचिता गोसावी, धनश्री जाधव, श्रुती जोशी, तन्वी गोगटे, विवा तळाशिलकर, दुर्वा नाईक, सचिन ठाकूर, रूत्वी सुर्वे, ममता डांगमोडेकर, ग्रॅफिना लेम, पूनम देसाई आदी विद्यार्थी उपस्थित होते.












