शिरोडा येथे सात कोटीचे देव माशाची उलटी सदृश्य पदार्थ जप्त चौघे ताब्यात

सावंतवाडी वनविभागाची कारवाई

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथे सात कोटी रुपयांची अंबरग्रीस (देव माशाची उलटी) शिरोडा येथे जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई सावंतवाडी वनविभागाच्या माध्यमातून शिरोडा येथे करण्यात आली. रणजीत रामचंद्र नायर (वय ४०) वैभव आडारकर (वय ३५) दोघे राहणार शिरोडा, निलेश मनोहर पांडजी (वय ३३) रा. रेडी आणि अन्य एक या चौघांचा समावेश आहे. त्यांच्याकडून तब्बल नऊ किलो उलटी जप्त करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिरोडा परिसरात काही व्यक्ती अंबरग्रीसची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती सावंतवाडी वनक्षेत्रपाल फिरत्या पथकाचे सचिन शिरतुरे यांना मिळाली होती. त्यानुसार उपवनसंरक्षक मिलीश. शर्मा, विभागीय वनाधिकारी संजय वाघमोडे आणि सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः बनावट ग्राहक बनून या तस्करांशी संपर्क साधला. सायंकाळी सातच्या सुमारास तस्कर अंबरग्रीस घेऊन विक्रीसाठी आले असता, दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांच्यावर झडप घातली.

या चौघांकडून ९ किलोपेक्षा जास्त वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले आहे. ब्लू व्हेल हा प्राणी वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची १ मध्ये येत असल्याने हा पदार्थ जवळ बाळगणे आणि त्याची विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे. ही यशस्वी कारवाई वनक्षेत्रपाल सचिन शिदतुरे, अमित कटके, वनपाल सावळा कांबळे, महेश पाटील, वनरक्षक ब्रम्हकुमार भोजने, संग्राम पाटील, अनिकेत माने, रवींद्र पाटील, रिषीका होले आणि चालक नितीन सावंत यांच्या पथकाने केली. पैशांच्या हव्यासापोटी अशा प्रकारचे गुन्हे वाढत असून, नागरिकांना कोणत्याही दुर्मिळ वन्यप्राण्यांचे अवशेष किंवा असे पदार्थ आढळल्यास तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.