चौके येथील दुर्घटना; डंपरला ओव्हरटेक करताना झाला अपघात
मालवण (प्रतिनिधी) : मालवण येथून चौकेच्या दिशेने येणाऱ्या डंपरला दुचाकीने ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या वाहनाला घाबरून डंपरच्या टायरच्या वरच्या भागाला अडकून डंपर खाली गेल्याने चौके नांदरुख येथील चंद्रकांत यशवंत चव्हाण (वय ४०, रा. चौके नांदरुख) याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास चौके धनगराचा गोठा येथे ही दुर्घटना घडली.
चंद्रकांत यशवंत चव्हाण हा युवक नेहमीप्रमाणे आपली एक्टिवा दुचाकी MH07 AD1633 याने आपला मेव्हणा याच्यासोबत कामावरून घराच्या दिशेने येत असताना अगदी घराच्या काही अंतरावर असलेल्या मालवण कसाल मार्गावर चौके धनगराचा गोठा येथे डंपरला MH07X 0666 ओव्हरटेक करत असताना अपघात होऊन डंपर खाली गेल्याने जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. सोबत असलेला मेव्हणा महादेव पांडुरंग लाड याला किरकोळ दुखापत झाल्याने उपचारासाठी चौके रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघाताची खबर मिळतात चौके ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. अपघातात मृत्युमुखी पावलेला चंद्रकांत हा गरीब कुटुंबातील विवाहित युवक सेंट्रींगचे कामे करायचा. शांत स्वभाव व सर्वत्र परिचित असा होता. त्याच्या पश्चात पत्नी, शिक्षण घेणाऱ्या दोन मुली, एक मुलगा असा परिवार असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी चौके येथील राजा गावडे, संतोष गावडे, बीजी गावडे, बंड्या गावडे, अजित गावडे, साई गावडे, सचिन आंबेरकर आदी ग्रामस्थांनी धाव घेतली. पोलीस पाटील रोहन चौकेकर यांनी अपघाताची खबर दिली. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.












