सावंतवाडीत १४ मार्चपासून ‘वैश्यवाणी प्रीमिअर लीग’चा रणसंग्राम

हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेचे आयोजन

उद्घाटन कार्यक्रमास येणार भारतीय संघातील एक प्रमुख खेळाडू

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेच्या वतीने येत्या १४ आणि १५ मार्च रोजी ‘वैश्य वाणी प्रीमिअर लीग’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वैश्य समाजातील युवक आणि महिलांना संघटित करण्याच्या हेतूने ही स्पर्धा खेळवली जाणार असून, याचे नियोजन सावंतवाडी शहर मर्यादित असेल, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अमित गवंडळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, या स्पर्धेच्या उद्घाटन किंवा बक्षीस वितरण समारंभासाठी भारतीय क्रिकेट संघातील एक प्रमुख क्रिकेटपटू उपस्थित राहणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली.

हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेच्या वतीने आयोजित या क्रिकेट लीगसाठी प्रथम पारितोषिक २५ हजार रुपये, तर द्वितीय पारितोषिक १५ हजार रुपये आणि चषक असे असणार आहे. या संघटनेच्या माध्यमातून केवळ क्रीडा स्पर्धाच नव्हे, तर सामाजिक उपक्रमही राबवले जात आहेत. नुकतीच कॅन्सर हॉस्पिटलला संघटनेकडून मदत करण्यात आल्याचे शैलेश गवंडळकर यांनी सांगितले. भविष्यातही विविध सामाजिक कार्ये करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

लिलाव प्रक्रिया आणि सहभाग

स्पर्धेच्या स्वरूपाबाबत माहिती देताना सल्लागार अरुण भिसे म्हणाले की, “सावंतवाडी शहर, कोलगाव, माजगाव आणि चराठा या शहरालगत असलेल्या गावांमधील समाजबांधव या स्पर्धेत सहभागी होतील. खेळाडूंना ४ मार्चपर्यंत आपली नावे नोंदवायची असून, ८ मार्च रोजी खेळाडूंचा लिलाव (Auction) पार पडणार आहे.” शहरातून सुरू झालेला हा उपक्रम आगामी काळात तालुका आणि जिल्हा स्तरावर नेण्याचे संघटनेचे नियोजन आहे.

या नियोजित स्पर्धेच्या अधिकृत घोषणेवेळी हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये अध्यक्ष अमित गवंडळकर, उपाध्यक्ष सुनील मिशाळ, राजेश काणेकर, सचिव श्रेयस मुंज, खजिन्दर नित्यानंद कोरगांवकर, सल्लागार अरुण भिसे तसेच प्रसाद नार्वेकर, बंड्या कोरगावकर, आबा केसरकर, शैलेश गवंडळकर, प्रशांत वाळके, जयेश स्वार, महेश बांदेकर, ऋतिक कोरगावकर, अण्णा म्हापसेकर, सलील वंजारी, रूपेश कुडतरकर, महेश देऊलकर या सर्वांच्या उपस्थितीत वैश्य बांधवांनी आपापल्या संघांच्या माध्यमातून या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.