पोलिसांचा थरारक पाठलाग
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राज्य मार्ग क्रमांक १६६ वर महामार्ग पोलिस कसाल यांच्याकडून नाधवडे बांधवाडी येथे एका मोटारसायकल स्वाराला जोरदार धडक देऊन पळून जाणाऱ्या डंपर चालकाचा पोलिसांनी थरारक पाठलाग करून त्याला तळेरे येथे ताब्यात घेतले. पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आरोपी डंपर चालक अवघ्या काही वेळातच पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
मिळालेल्या माहितीनुसार, आज ९ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास राज्य मार्ग क्रमांक १६६ वरील नाधवडे बांधवाडी येथे हा अपघात झाला. चेतन परशुराम इस्वलकर (रा. नाधवडे, वैभववाडी) हे आपल्या मोटारसायकलवरून जात असताना, एका भरधाव डंपरने त्यांना जोरदार ठोकर दिली. या अपघातात चेतन इस्वलकर हे गंभीर जखमी झाले. मात्र, अपघातानंतर जखमीला मदत करण्याऐवजी डंपर चालक डंपरसह घटनास्थळावरून वेगाने पळून गेला.
या अपघाताची माहिती मिळताच तरळे येथे कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलीस अंमलदारांनी तात्काळ सूत्रे हलवली. एएसआय प्रकाश गवस, पोलीस हवालदार बिर्जे, पोलीस नाईक शेट्ये, पोलीस कॉन्स्टेबल खडपकर, सागर परब यांनी अत्यंत तत्परता दाखवत पळून जाणाऱ्या डंपरचा माग काढला आणि पाठलाग सुरू केला. पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे आणि वेगाने पाठलाग करत अखेर तळेरे या ठिकाणी डंपरला गाठले आणि डंपर चालक रणजीत शिंदे (रा. कर्नाटक) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी डंपर चालकासह वाहनाला पुढील कायदेशीर कारवाईसाठी वैभववाडी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले आहे. दरम्यान, अपघातातील जखमी मोटारसायकल स्वार चेतन इस्वलकर यांना तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. भररस्त्यात अपघात करून पळ काढणाऱ्या चालकाला पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तातडीने अटक झाल्याने पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.













