मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन खेड येथील रघुवीर घाटाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष निधी मंजूर करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी व सातारा जिल्ह्यांना जोडणारा रघुवीर घाट हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. महाबळेश्वर, सातारा तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि पर्यटक यांच्यासाठी हा घाटमार्ग अत्यंत उपयुक्त असून या मार्गाचे आधुनिकीकरण करणे ही काळाची गरज आहे. सध्या रघुवीर घाटाची अवस्था अत्यंत दयनीय असून रस्ता अरुंद, वळणावळणाचा व अनेक ठिकाणी खराब झाला आहे. संरक्षक भिंती, रिटेनिंग वॉल, पावसाळी पाण्याचा निचरा, सुरक्षित कठडे, तसेच आवश्यक ठिकाणी रस्ता रुंदीकरणाची कामे तातडीने होणे आवश्यक आहे.
याशिवाय, हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत निसर्गरम्य असल्याने घाटामध्ये निवडक ठिकाणी व्ह्यू पॉइंट, पर्यटकांसाठी बसण्याची व्यवस्था, पार्किंग, स्वच्छतागृहे, सुशोभीकरण, वृक्षारोपण आणि सुरक्षितता उपाययोजना करण्यात याव्यात.
त्यामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे रघुवीर घाटाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक अंदाजपत्रक तयार करून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तातडीने विशेष निधी मंजूर करण्यात यावा, तसेच ही विकासकामे प्राधान्याने हाती घेऊन लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित विभागामार्फत प्रस्तावाची सकारात्मक दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.













