देवगड (प्रतिनिधी) : सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण आणि अमली पदार्थांच्या दुष्परिणामांपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन देवगडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे यांनी व्यक्त केले.
जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत देवगड पोलीस ठाण्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सायबर सुरक्षा व अमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर मुख्याध्यापक सुनील जाधव, महिला पोलीस हवालदार सविता लाड, स्नेहा गावडे, श्रेयस कुबल उपस्थित होते. तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता सायबर सुरक्षेबाबत जागरुकता आणि अमली पदार्थांपासून दूर राहण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारणे आवश्यक आहे, असेही श्रीमती बंगडे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी डिजिटल जगात सावध राहावे आणि निरोगी, व्यसनमुक्त जीवनाचा स्वीकार करावा, या संदेशातून देवगड पोलीस ठाण्याने हा जनजागृतीचा प्रभावी उपक्रम राबविला. स्नेहा गावडे, श्रेयस ‘कुबल यांनी अमली पदार्थांच्या दुष्परिणामासंदर्भात फिल्म व सायबर सुरक्षेबाबत पीपीटी दाखवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी केले.













