कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची तडकाफडकी बदली

API जयदीप पाटील यांच्याकडे पदभार

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची अचानक बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) जयदीप पाटील यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपवण्यात आला आहे. मगदूम यांच्या तडकाफडकी बदलीमुळे सध्या कुडाळ मध्ये चर्चाना उधाण आले आहे.

राजेंद्र मगदूम यांनी आपल्या कारकिर्दीत कुडाळमध्ये चांगली कामगिरी केली होती. अनेक गुन्ह्यांचा छडा लावून त्यांनी दोषी आरोपींना जेरबंद केले होते. एकीकडे गुन्हेगारांवर वचक असतानाच, दुसरीकडे त्यांनी सर्वसामान्य जनतेशी आणि विविध विभागांशी उत्तम समन्वय साधून काम केले होते. त्यांच्या या कार्यशैलीमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना होती.

राजेंद्र मगदूम यांची बदली झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर सध्यातरी API जयदीप पाटील हे कामकाज पाहणार आहेत. त्यांच्याकडे हा तात्पुरता चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, ही बदली नेमकी कोणत्या कारणास्तव झाली, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. परंतु, अत्यंत कार्यक्षम अधिकाऱ्याची अशा प्रकारे तडकाफडकी बदली होणे हा सध्या कुडाळमधील चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

आगामी काळात कुडाळ पोलीस ठाण्याच्या कायमस्वरूपी निरीक्षकपदी कोणाची वर्णी लागते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.