कणकवलीत कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींचा वाढता त्रास

सायलेन्सर बदलून नियमबाह्य वाहतूक; नागरिकांमधून तीव्र संताप

कणकवली (प्रतिनिधी) : शहरात कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः काही वाहनधारक नोंदणी कालावधी संपलेल्या किंवा नियमबाह्य दुचाकींना बदल केलेले सायलेन्सर लावून मोठा आवाज करत रस्त्यांवरून फिरताना दिसत आहेत. या कर्कश आवाजामुळे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्री उशिरापर्यंत अशा दुचाकींची वर्दळ सुरू असल्याने शांततेचा भंग होत असून नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून सायलेन्सरमध्ये बदल करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. तसेच अशा वाहनांवर विशेष मोहीम राबवून दंडात्मक कारवाई करावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.