आ. निलेश राणेंची यशस्वी मध्यस्थी : तळाशीलवासीयांचे आंदोलन नवव्या दिवशी मागे

कालावल खाडीतील बेकायदा वाळू उपसा कायमचा बंद होणार

आ. निलेश राणे यांचे आश्वासन

मालवण (प्रतिनिधी) : कालावल खाडीपात्रातील तळाशील समोर शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर दरम्यान बेकायदेशीर वाळू उपसा बंद करावा यासह अन्य मागण्यांसाठी तळाशील वासियांनी छेडलेल्या आंदोलनाला नवव्या दिवशी यश आले. आमदार निलेश राणे यांच्या मध्यस्थीने काल ओरोस येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत प्रशासकीय अधिकारी व तळाशील ग्रामस्थ यांच्यात बैठक झाल्यानंतर सायंकाळी आमदार निलेश राणे यांनी तळाशील येथे आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे कालावल खाडीपात्रात शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर या खाडीपट्ट्यात वाळू उपसा होणार नाही व यापुढे वाळू उपसा करण्यास परवानगी मिळणार नाही, असा शब्द दिला. तसेच येथील किनारपट्टीची धूप रोखण्यासाठी सुमारे ७ कोटी रुपयांचे बंधारे मंजूर झाले असून यातील एका बंधाऱ्याचे वर्कऑर्डरचे पत्रच निलेश राणे यांनी ग्रामस्थांना सुपूर्द केले. तर दुसरे पत्र उद्या किंवा परवा देऊ, असे सांगितले. अन्य मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने तळाशील ग्रामस्थांनी आपले आंदोलन स्थगित केले.