आंतरराष्ट्रीय दशावतार कलाकार गौरव शिर्के यांचा गौरव
सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील श्री देव महापुरुष देवस्थान, खासकीलवाडा गोठण येथे सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेली श्री सत्यनारायण महापूजा आणि वार्षिक धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मंगलमय दिनाचे औचित्य साधून जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ, आरोस यांचा ‘दख्खनचा राजा ज्योतिबा माझा’ हा ट्रिकसीन युक्त नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. या प्रयोगातील नवनवीन तांत्रिक कलाकृतींनी उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी दर्जेदार कला सादर केल्याबद्दल नाट्य मंडळाचे मालक शरद मोचेमाडकर आणि सुवर्णकुमार मोचेमाडकर यांचा संतोष सगम यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दशावतार कलेला जागतिक स्तरावर नेणारे गोठणचे सुपुत्र आणि ज्येष्ठ नाट्य कलावंत भाई शिर्के यांचे चिरंजीव गौरव शिर्के यांचा झालेला जाहीर सत्कार. गौरव शिर्के यांनी दशावतार कलेच्या माध्यमातून ७२ हून अधिक जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार पटकावले असून, ६ देशांनी त्यांचा गौरव केला आहे. तसेच ‘वर्ल्ड एक्सलंट बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये त्यांची नोंद झाली असून सध्या ते दशावतार विषयावर डॉक्टरेट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या देदीप्यमान यशाबद्दल श्री देव महापुरुष मित्र मंडळ, गोठण यांच्या वतीने हितेन नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याप्रसंगी हितेन नाईक, संतोष सगम, बाबी धुरी, अजित सावंत, ओंकार कुडतरकर, विकी हवालदार, बाबू राणे, बाबल्या संगम, साई सगम, रवी कळंगुटकर, सुरज कळंगुटकर, नरेंद्र सावंत, अजय गावडे, ललिता नाईक, नरू सावंत, यश कंगराळकर, सतीश कळंगुटकर, अमित रंकाळे, संजय हवालदार, संजय गावडे, अजय ठाकूर, दीपक लठे, रजत सावंत, अक्षय ठाकूर यांसह मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.












