कणकवली (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्र सेवादल, सिंधुदुर्ग यांच्यावतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १४ एप्रिल रोजी गोपुरी आश्रम, वागदे-कणकवली येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत होणार आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित विचारांची आजच्या समाजात अधिक गरज असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करताना समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, संविधाननिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमास जिल्ह्यातील आंबेडकरवादी, समाजवादी, संविधानवादी, लोकशाहीवादी तसेच विज्ञाननिष्ठ विचारांच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन राष्ट्र सेवादलाच्यावतीने करण्यात आले आहे. गोपुरी आश्रमाचे व्यवस्थापक विनायक (बाळू) मेस्त्री, अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, ज्येष्ठ सेवादल साथी कमलताई परुळेकर, संघटक नितीन वाळके (मालवण), सुहास ठाकुर-देसाई, संजय वेतुरेकर (कुडाळ), विजयालक्ष्मी चिंडक, मूर्ती कासार (सावंतवाडी), सहदेव पाटकर, अॅड. प्रवीण नाईक, डॉ. सुभाष सावंत, भाई परमेकर, सूचन कोरगावकर, प्रा. प्रज्ञाकुमार गाथाडे आदी मान्यवरांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करण्याचे आवाहन केले आहे.












