तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन
कणकवलीत जनगणनेच्या प्रगणकांच्या प्रशिक्षणाला सुरुवात
कणकवली (प्रतिनिधी) : जनगणना ही राष्ट्राच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. प्रगणकांनी प्रशिक्षणातील प्रत्येक तांत्रिक बाब गांभीर्याने समजून घ्यावी. प्रत्यक्ष क्षेत्रात काम करताना माहितीची अचूकता राखणे ही तुमची मुख्य जबाबदारी आहे.
कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत मोलाचे ठरेल. असे प्रतिपादन कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले.
कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात आणि विद्यामंदिर प्रशाला या दोन ठिकाणी जनगणनेच्या प्रगणकांसाठी आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षणाला गुरूवारी उत्साहात सुरुवात झाली. यावेळी एचपीसीएल सभागृहात तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाद्वारे पहिल्या टप्प्यात दोन ठिकाणी १०० प्रगणकांना जनगणनेच्या कामाचे तांत्रिक आणि क्षेत्रीय मार्गदर्शन दिले जात आहे.
कणकवली कॉलेजमधील एचपीसीएल हॉल येथे ५० आणि विद्यामंदिर प्रशाला येथे ५० अशा दोन स्वतंत्र तुकड्यांना प्रशिक्षण २५ एप्रिल पर्यंत देण्यात याणार आहे. यानंतर, प्रगणकांच्या आणखी दोन नवीन बॅचेसचे प्रशिक्षण २७, २८ आणि २९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण वर्गाला तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नायब तहसीलदार मंडले, संभाजी खाडे, सत्यवान माळवे, महसूल सहायक गौरी पाटील व गायकवाड यांनी भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. क्षेत्रीय प्रशिक्षक म्हणून पिराजी कांबळे, अजय गुरसाळे, विजय वरक आणि मनोहर कांबळे हे प्रगणकांना जनगणनेची माहिती अचूकपणे कशी नोंदवावी, याबाबत सविस्तर प्रशिक्षण देत आहेत.
प्रशिक्षणादरम्यान प्रगणकांच्या शंकांचे निरसन करण्यात येत असून, महसूल विभागाचे अधिकारी या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.












