स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांशी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी साधला संवाद
रस्त्याच्या डागडुजीचीही दिली ग्वाही
कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील पटवर्धन चौक ते किनई रस्ता या महत्त्वाच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा बंदिस्त गटार बांधकामाच्या अनुषंगाने नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक नागरिक तसेच व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी नगरपंचायतीच्या विकास कामांना पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट करत समाधान व्यक्त केले.
पटवर्धन चौक ते किनई रस्ता हा शहरातील वर्दळीचा मार्ग असून या परिसरात पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास अडचणी निर्माण होत होत्या. तसेच रस्त्याच्या बाजूला पाणी साचल्याने नागरिक व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी नगरपंचायतीमार्फत रस्त्याच्या दुतर्फा बंदिस्त गटार उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी संबंधित ठिकाणी भेट देत कामाच्या आराखड्याची माहिती नागरिकांना दिली. व्यापाऱ्यांनीही या कामामुळे भविष्यात परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि सुटसुटीत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
काही ठिकाणी वाहतूक कोंडी व रस्त्यावरील अडथळ्यांबाबत सूचना करण्यात आल्या. त्यावर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सर्व सूचना विचारात घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी नागरिकांनी नगरपंचायतीच्या विकासाभिमुख भूमिकेचे स्वागत करत आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
तसेच सध्या रस्त्यावरील खड्डे व खराब झालेल्या भागांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीही करण्यात आली. यावर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी पटवर्धन चौक ते किनई रस्ता येथील डागडुजीचे काम लवकरात लवकर हाती घेऊन पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
शहरातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी नगरपंचायत कटिबद्ध असून नागरिकांच्या सहकार्याने विकासकामांना अधिक गती दिली जाईल, असेही नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले.
यावेळी नगरपंचायत इंजिनिअर नेमाने, सचिन नेरकर, मनोज तोरसकर, नारायण अंधारी, शीतल मांजरेकर, रामदास मांजरेकर, जय शेट्ये, विशाल हर्णे, प्रकाश मुसळे, जीवन माणगावकर, डॉ. राणे सुजित जाधव, संतोष पुजारे, वैभव मालांडकर अमित मयेकर, चेतन अंधारी, हरी निखार्गे आदी उपस्थित होते.












