महाराष्ट्र शासन व नाम फाऊंडेशन आणि टाटा मोटर्स चा संयुक्त उपक्रम
सुमारे १८ लाख रुपये निधी मंजूर
खारेपाटण (संतोष पाटणकर) : महाराष्ट्र शासन व सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती तसेच नाम फाऊंडेशन आणि टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण या गावासह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरील अनेक गावांना जोडणारी व विजयदुर्ग खाडीला जाऊन मिळालेली शुक नदीतील गाळ उपसा कामाचा शुभारंभ नुकताच माजी जि.प. बांधकाम व वित्त सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या प्रमुख उपस्थीत व खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत यांच्या शुभहस्ते आज शुक्रवार दि. २४ एप्रिल २०२६ रोजी श्रीफळ फोडून करण्यात आला.
या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, माजी उपसरपंच इस्माईल मुकादम, चिंचवली सरपंच अशोक पाटील, उपसरपंच राजू पेडणेकर, भाजप शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, खारेपाटण ग्रा. पं. सदस्य जयदीप देसाई, सुधाकर ढेकणे, दक्षता सुतार, युवा कार्यकर्ते प्रणय गुरसाळे, चिंचवली पोलिस पाटील दिगंबर भालेकर, नाम फाऊंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक दिग्विजय पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
याबाबत नुकतेच महाराष्ट्र शासन, सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती आणि टाटा मोटर्स व नाम फाऊंडेशन या संस्थेने पुढाकार घेऊन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील अनेक नद्यांमधील गाळ उपसा करण्यात येणार असून याचाच एक भाग म्हणून खारेपाटण शुक नदीतील गाळ उपसा करण्यात येणार आहे. नुकतेच याकरिता लागणाऱ्या सर्व मशीन खारेपाटण शुक नदी परिसरात दाखल झाल्या असून लवकरच खारेपाटण शुक नदीतील सर्व साचलेला गाळ उपसा करण्यात येणार आहे. यामुळे नदीचे पात्र रुंद होऊन पाणी साठ्याच्या पातळीत वाढ होणार आहे पर्यायाने येथील सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना मुबलक पाणी पुरवठा होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून सदर नदीचा गाळ उपासाचे काम मार्गी लागले असून खारेपाटण शुक नदीवरील जुना केटी बंधारा ते चिंचवली या भागातील नदी पात्रातील गाळ उपसा करण्यात येणार असल्याची माहिती खारेपाटण माजी सरपंच श्री रमाकांत राऊत यांनी यावेळी दिली. तर सुमारे १८ लाख रुपये एवढा निधी या गाळ उपसा कामासाठी मंजूर झाला असून खारेपाटण शुक नदीचे पात्र रुंद होऊन खोली वाढणार आहे. परिणामी पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे.
तसेच खारेपाटण शुक नदीतील गाळ उपसा केल्यामुळे परिसरातील गावांना याचा फायदाच होणार असून शेकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी मिळणार आहे. या नदीवरील असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीच्या साठवण टाकीत मोठ्या प्रमाणात पाणी साठवणूक होणार असून एप्रिल मे मध्ये होणारा पाण्याचा तुटवडा यामुळे कमी होणार आहे.












