नुकसानग्रस्त आंबा बागायतदार पोचले मातोश्रीवर

राजू शेट्टींसह, ठाकरे सेनेच्या नेत्यांसह उद्धव ठाकरेंची घेतली भेट

15 मे ला मुंबईत धडकणार आक्रोश मोर्चा

ब्युरो न्यूज (मुंबई) : गेल्या दोन महिन्यांपासून मदतीसाठी टाहो फोडणाऱ्या कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात राज्य सरकारने हेक्टरी केवळ २२ हजार रुपये टाकून त्यांची क्रूर चेष्टा केली आहे. या अन्यायाविरोधात आता कोकणचा शेतकरी मुंबईत धडकणार असून, येत्या १५ मे रोजी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानापर्यंत महामोर्चा काढण्यात येणार आहे. “या लढ्यात सर्व शिवसैनिक रस्त्यावर उतरून सरकारला गुडघे टेकायला भाग पाडतील,” असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

‘मातोश्री’वर खलबते; राजकीय वज्रमूठ

कोकणातील आंबा बागायतदारांच्या एका शिष्टमंडळाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यात आली. या मोर्चाला केवळ शिवसेनेचाच नव्हे, तर मनसे, राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि इतर विविध संघटनांनीही पाठिंबा दिला असून त्यांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते यात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

शेतकऱ्यांची व्यथा आणि सरकारवर टीका

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, “गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच कोकणचा शेतकरी इतक्या मोठ्या संकटात सापडून रस्त्यावर उतरला आहे. सरकार उद्योगपतींची कर्जे माफ करण्यात धन्यता मानत आहे, मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.”

चालू वर्षी अवकाळी पाऊस, मोहोर गळती, तापमानातील चढ-उतार आणि फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे आंबा बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. कृषी विद्यापीठे आणि शास्त्रज्ञांनी उपाययोजना करणे अपेक्षित असताना सरकारी यंत्रणेने केवळ कागदावरच घोडे नाचवले, असा आरोपही यावेळी करण्यात आला.

या बैठकीला खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, माजी आमदार बाळ माने, माजी आमदार वैभव नाईक, युवा सेना देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर, सिंधुदुर्ग युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, अजय तेली, उमेश वाळके यांच्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो बागायतदार उपस्थित होते. कोकणचा कणा असलेला आंबा, काजू आणि मत्स्य शेतकरी आता आपल्या हक्कासाठी मुंबईत एल्गार पुकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.