नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !
कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव येथे प्रस्तावित टोल नाका जिल्ह्याच्या मध्यभागी ठेवण्यात येत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांवर अन्यायकारक आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा टोल नाका तात्काळ रद्द करून जिल्ह्याच्या सीमेवर स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केली आहे.
शुक्रवारी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील नागरिकांना दैनंदिन कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय, न्यायालय, आरटीओ तसेच पोलीस मुख्यालय ओरोस येथे वारंवार ये-जा करावी लागते. विशेषतः देवगड, वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातील नागरिकांना या टोल नाक्याचा मोठा फटका बसणार आहे. जिल्ह्याच्या अंतर्गत प्रवासासाठी स्थानिकांकडून टोल आकारणी करणे अन्यायकारक असून, यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व व्यावसायिक यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच उपलब्ध माहितीनुसार या टोल नाक्यावरून दरमहा सुमारे पाच कोटी रुपयांची वसुली होण्याची शक्यता असून, त्यातील बहुतांश रक्कम स्थानिक नागरिकांकडूनच वसूल होणार असल्याने हा प्रकार अस्वीकार्य असल्याचे संदेश पारकर यांनी म्हटले आहे.
ओसरगाव येथील प्रस्तावित टोल नाका रद्द करून तो बांदा किंवा खारेपाटण येथे स्थलांतरित करण्यात यावा, सिंधुदुर्ग जिल्हा टोलमुक्त करण्यात यावा, MH-07 क्रमांकाच्या तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोंद असलेल्या वाहनांना टोलमाफी द्यावी, जिल्ह्याच्या अंतर्गत प्रवासासाठी टोल आकारणी थांबवावी, तसेच स्थानिक संघटनांशी चर्चा करून निर्णय घ्यावा, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.













