१ मे रोजी सुरू होणाऱ्या जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे

निलेश राणे यांचे आवाहन

कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी १ मे पासून सुरू होणाऱ्या जनगणनेच्या प्रक्रियेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी केले आहे. देशाच्या विकासाच्या दृष्टीने ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. देशाच्या भविष्यातील विकासाचे नियोजन करताना लोकसंख्येची अचूक आणि वास्तववादी माहिती असणे अत्यंत आवश्यक असते. जनगणनेच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेल्या माहितीवरच देशाच्या विविध कल्याणकारी योजना आणि धोरणे अवलंबून असतात, असे आमदार निलेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. जनगणना कर्मचाऱ्यांकडे माहिती नोंदवताना ती कोणतीही लपवाछपवी न करता सत्य आणि अचूक असावी. आपली माहिती देशाच्या विकासासाठी पायाभूत ठरणार आहे, हे लक्षात घेऊन नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखावी. ही एक राष्ट्रीय प्रक्रिया असून, त्यात प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग देशसेवेसाठी महत्त्वाचा आहे.

“लोकसंख्येची योग्य माहिती मिळाल्यास देशाला विकासाच्या दिशेने नेणे सोपे होते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपली माहिती प्रामाणिकपणे पुरवून देशसेवेमध्ये आपला खारीचा वाटा उचलावा,” अशी विनंती आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला केली आहे.