होळी उत्सवासाठी जादा रेल्वे गाड्या

कणकवली (प्रतिनिधी) : आगामी होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मुंबई सीएसएमटी सावंतवाडी रोड आणि मडगाव-पनवेल दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सणानिमित्त गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई सीएसएमटी- सावंतवाडी रोड विशेष ०१०७१ गाडी मुंबई सीएसएमटी येथून रविवार, १ मार्च रोजी मध्यरात्री १२.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ०१०७२ ही गाडी रविवार, १ मार्च रोजी सावंतवाडी रोड येथून सायंकाळी ५.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबणार आहे.

मडगाव- पनवेल ०११०६ ही गाडी मडगाव जंक्शन येथून बुधवार ४ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ०११०५ ही गाडी गुरुवार ५ मार्च रोजी पनवेल येथून पहाटे ५.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ६.१० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल. ही गाडी करमळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेण या स्थानकांवर थांबणार आहे.

होळीच्या काळात नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. आता या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना प्रवास करणे अधिक सुलभ होणार आहे. प्रवाशांनी या विशेष फेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.