संगीत विश्वातील एका ‘अविस्मरणीय’ युगाचा अंत ! आशाताई भोसले यांचे निधन

मुंबई (प्रतिनिधी) : गेली सात दशके आपल्या गाण्याने संगीत क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या, आपल्या आवाजाने प्रत्येक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका, सुरांची मलिका आशा भोसले यांनी आज जगाचा निरोप घेतला. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. सात दशकांपासूनची सुरांची साथ संगत थांबली. आपल्या लाडक्या आशाताई आपल्यातून कायमच्या निघून गेल्या. एका युगाचा अस्त झाला आहे. काल संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल असं वाटत होतं. पण आज त्यांनी अखेरचा निरोप घेतला. विविध भाषेतून तब्बल 12 हजार गाणी गाणारी सुरांची मल्लिका काळाच्या पडद्याआड गेली. आशाताईच्या निधनाने बॉलिवूडच नाही तर संगीत क्षेत्र एका महान गायिकेला मुकला आहे.