Breaking News

वाडा येथे अवैध खतसाठ्यावर तालुका कृषी विभागाची धाड

वाडा येथे अवैध खतसाठ्यावर तालुका कृषी विभागाची धाड

५७ हजार रुपयांचा अवैध सेंद्रिय खतसाठा व वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक कृषी विभागाकडून जप्त

सत्यवान परब यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू; देवगड तालुक्यात खळबळ

देवगड (प्रतिनिधी) : वाडा येथील सत्यवान परशुराम परब यांच्या ताब्यातील अवैध खतसाठ्यावर देवगड तालुका कृषी विभागाने धाड टाकून खत वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या ट्रकसह सुमारे ५७हजार रुपयांचा सेंद्रिय खतसाठा जप्त केला आहे. तसेच संबंधित गोदामही सील करण्यात आले असून, कृषी विभागाच्या या कारवाईमुळे देवगड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा कृषी अधीक्षक, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड तालुका कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. बुधवारी सायंकाळी वाडा येथील आंबेडकर चौक परिसरात एका गोदामासमोर ट्रक उभा करून त्यामधील खताचा साठा गोदामात उतरविण्याचे काम सुरू असताना कृषी विभागाच्या पथकाने अचानक धाड टाकली.

या कारवाईत विनापरवाना वाहतूक करून साठवण्यात आलेल्या सेंद्रिय खताच्या सुमारे १०० पोत्यांचा साठा, ज्याची किंमत अंदाजे ५७ हजार रुपये आहे, जप्त करण्यात आला. तसेच खत वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रकही कृषी विभागाने ताब्यात घेतला आहे.

अवैधरीत्या खताचा साठा केल्याप्रकरणी सत्यवान परशुराम परब यांच्याविरोधात नियमानुसार कारवाई करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. कृषी विभागाच्या या धडक कारवाईमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून अवैध खतव्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.