केसरकरांच्या पाठीशी शिवसेना ठाम; ‘उबाठा’ आंदोलनावर संजू परबांचा हल्लाबोल”

सावंतवाडी(प्रतिनिधी) : माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या पाठीशी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते ठामपणे उभे असल्याचा निर्धार शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केला. काही ‘उबाठा’ पदाधिकारी कुणाकडूनतरी पैसे घेऊन आंदोलन करत असून अशा आंदोलनांमुळे केसरकरांचे महत्त्व कमी होणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना परब म्हणाले की, आज केसरकरांवर टीका करणारेच काही लोक काही वर्षांपूर्वी त्यांच्या आश्रयावर होते. मात्र आता तेच लोक नाहक आरोप करत आंदोलन करत आहेत. ही आंदोलने स्वार्थासाठी आणि पैशांच्या जोरावर उभी केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, दीपक केसरकर हे चार वेळा निवडून आलेले आमदार असून त्यांनी मंत्रीपदही भूषवले आहे. ते श्रद्धाळू व्यक्तिमत्त्व असून विविध देवस्थळांना भेट देतात. केवळ एखादा फोटो समोर आल्यामुळे त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे चुकीचे आहे. सावंतवाडीची जनता त्यांच्या स्वभाव व कामाची पूर्ण ओळख ठेवते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका करत परब यांनी “त्यांचेही नेते संबंधित ठिकाणी गेले होते,” असा टोला लगावला.

दरम्यान, आंदोलनासाठी बाहेरून माणसं आणली जात असल्याचा आरोप करत, मतदारसंघातील महिला मात्र केसरकरांच्या पाठीशी ठामपणे उभ्या असल्याचा दावा करण्यात आला. तसेच भोंदूबाबा अशोक खरात यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती महिला जिल्हाप्रमुख अॅड. निता सावंत-कविटकर यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.