सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मान्सूनने वेळेत हजेरी लावली असली तरी अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने सिंधुदुर्गातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. पावसाच्या भरोशावर भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पिके वाचविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मान्सूनच्या आगमनानंतर जिल्हाभरात भात पेरणीला वेग आला. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली; मात्र त्यानंतर पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने शेतशिवार कोरडे पडू लागले आहेत. वाढत्या उकाड्यामुळे आणि पाण्याअभावी नव्याने उगवलेली भात रोपे सुकण्याची भीती निर्माण झाली आहे.
जून महिन्याच्या १५ तारखेपर्यंत जिल्ह्यात केवळ १०३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही वर्षांच्या सरासरीशी तुलना करता हा आकडा अत्यंत कमी असून, याच कालावधीत साधारण ४४० मिमी पाऊस अपेक्षित असतो. म्हणजेच यंदा आतापर्यंत सरासरीच्या केवळ २३ टक्के पाऊस झाला आहे.
पावसाच्या या लांबलेल्या खंडामुळे शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षा चिंतेत बदलल्या आहेत. आता संपूर्ण बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले असून, दमदार आणि सलग पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास भात शेतीसह खरीप हंगामावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.













