ठेकेदार एक कामे अनेक च्या टॅगलाईनखाली सत्यजित पारकर यांनी केला “त्या’ ठेकेदाराचा पोलखोल

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीच्या विशेष सभेत प्रशासकीय काळात मंजूर झालेली तब्बल २१ टेंडर रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. एकाच ठेकेदाराला सुमारे ८ कोटी रुपयांची कामे देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नगरसेवक बाळू पारकर यांनी केला. पारकर म्हणाले, मराठा मंडळ ते स्मशानभूमी गटार बांधकामासाठी काळा दगड वापरणे अपेक्षित असताना, त्याऐवजी जांभा दगड वापरून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तेली आळी येथे बांधण्यात आलेली सार्वजनिक विहीर नगरसेवक बंडू हर्णे यांच्या घरामागेच उभारण्यात आली असून, या विहिरीत इलेक्ट्रिक पंप वापरणे शक्य नसतानाही सहा पंप लावून पाणी उपसा केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. याशिवाय टेंबवाडी येथील फुटपाथ तसेच पटकीदेवी मंदिर ते रेल्वे स्टेशन या जुन्या रस्त्याचे कामही निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आणण्यात आले. २०१८ ते २०२५ या कालावधीत एकाच ठेकेदाराला तब्बल १४२ कामे देण्यात आल्याने तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोपही पारकर यांनी केला. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे प्रधान सचिव यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्याचे निर्देश नगरविकास मंत्रालयाकडून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये यासाठी काही माजी नगरसेवकांकडून सेटलमेंटचे प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, अशा दबावाला बळी पडणार नसल्याचे स्पष्ट करत “भ्रष्टाचारमुक्त कणकवली” हा आमचा निवडणूकपूर्व नारा होता आणि सत्तेत आल्यानंतर तोच आमचा ध्यास असल्याचे पारकर यांनी सांगितले. दरम्यान, सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी स्पर्धात्मक पद्धतीने बिलो रेटमध्ये आलेलीच टेंडर मंजूर केल्याचे सांगत, यापुढे कणकवली नगरपंचायतीत पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार दिसेल, असा विश्वास बाळू पारकर यांनी व्यक्त केला.