मृत युवती फोंडाघाट मधील ; स्वतःची लग्नपत्रिका मामाच्या घरी ठेवून परतत असताना घडली दुर्घटना
कणकवली (प्रतिनिधी): तालुक्यातील कसवण – तळवडे (बौद्धवाडी) येथील रस्त्यावर एसटी बस आणि मोटरसायकल मध्ये झालेल्या अपघातात मोटरसायकलवर मागे बसलेल्या युवतीचा वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. निकिता दिलीप सावंत ( वय 28, रा.फोंडाघाट ) असे मृत मुलीचे नाव आहे. मयत निकिता हीचा भाऊ वैभव मोटरसायकल चालवत होता. अपघातात त्याच्या पाठीमागे बसलेल्या निकीताचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी 19ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 : 45 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातास कारणीभूत ठरलेल्या तिच्या भावाविरुद्ध, वैभव दिलीप सावंत (वय ३५) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसटी बस चालक कृष्णा चंद्रकांत नेरकर (रा. कणकवली जळकेवाडी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते कणकवली आगाराची (क्र. MH 14 BT 1401) बस घेऊन कणकवली ते आंब्रड बाजार या मार्गावर जात होते. सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास तळवडे (बौद्धवाडी) येथील चढणीच्या रस्त्यावर आंब्रड दिशेकडून येणारी शाईन कंपनीची मोटारसायकल (क्र. MH 07 AR 9247) त्यांच्या बसजवळ आली.
मोटारसायकलस्वार वैभव सावंत याने आपली दुचाकी अतिशय भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवल्यामुळे ती रस्त्याच्या कडेला असलेल्या काळेथर ग्रीडवरून स्लिप झाली. मोटारसायकलस्वार रस्त्याच्या बाहेर फेकला गेला, तर त्याच्या पाठीमागे बसलेली त्याची बहीण निकिता सावंत ही बसच्या मागील चाकाजवळ पडली. बसचे चाक तिच्या बरगडीस घासल्याने ती गंभीर जखमी झाली.
अपघातानंतर चालक नेरकर यांनी तात्काळ बस थांबवून वाहक आणि प्रवाशांच्या मदतीने दोघा जखमींना आंब्रड येथील डॉ. खटावकर यांच्याकडे उपचारासाठी नेले. निकिता सावंत गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी तिला कणकवली येथे आणण्यास सांगण्यात आले. नातेवाइकांनी तिला कणकवली येथील खासगी रुग्णालयात नेले, तेथून उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे दाखल केले असता, सायंकाळी ७.०० वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या अपघातात निकिता सावंत हिच्या मृत्यूस आणि मोटारसायकलचे नुकसान होण्यास वैभव दिलीप सावंत हा कारणीभूत ठरल्याने, बस चालक कृष्णा नेरकर यांच्या फिर्यादीनुसार, वैभव सावंत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, कणकवली पोलीस पुढील तपास करत आहेत.













