Breaking News

कोकणातील दुष्काळसदृश परिस्थितीची पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली दखल; तळेरेत शेतीची पाहणी

तळेरे (प्रतिनिधी) : राज्यातील बदलत्या हवामानामुळे आणि अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. विशेषतः कोकणातील अनेक भागांमध्ये शेती कोरडी पडू लागली असून जमिनीला भेगा पडत आहेत. भाताची रोपेही करपू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील तळेरे (वाघाचीवाडी) येथे प्रत्यक्ष भेट देत शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच संबंधित कृषी अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

शेतकऱ्यांना या संकटातून दिलासा मिळावा यासाठी शासनामार्फत विशेष मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना दिली.
या पाहणी दौऱ्यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, उप कृषी अधिकारी उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रविण ओहळ, मंडल कृषी अधिकारी अर्जुन जाधव, ग्रामपंचायत अधिकारी राजलक्ष्मी पेडणेकर, कृषी सेवक गजानन पवार, डॉ. विजयकुमार शेटये, पोलिस पाटील चंद्रकांत चव्हाण, मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर, वैभववाडी मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे तसेच ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.