Breaking News

आईच्या शेवटच्या इच्छेसाठी ११ वर्षीय तन्वीचे धाडस; पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली घरी जाऊन भेट

तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील तळेरे (वाघाचीवाडी) येथील अवघ्या ११ वर्षांच्या कु. तन्वी संदीप चव्हाण हिने आपल्या आईच्या शेवटच्या इच्छेचा मान राखत तिच्या पार्थिवाला अग्नी देण्याचे धाडस दाखविले. तिच्या या संवेदनशील, कर्तव्यनिष्ठ आणि धैर्यपूर्ण कृतीने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी तळेरे (वाघाचीवाडी) येथे जाऊन कु. तन्वी व तिच्या कुटुंबीयांची त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत तन्वीच्या धैर्याचे कौतुक केले.

यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, “दिवंगत मातोश्रींच्या आत्म्यास ईश्वर चिरशांती देवो, ही प्रार्थना. तसेच या अथांग दुःखातून सावरण्याचे बळ तन्वीला लाभो. तिच्या प्रत्येक सुख-दुःखात आम्ही कायम तिच्या पाठीशी आहोत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कु. तन्वीच्या धाडसी कृतीमुळे समाजात मुलींच्या धैर्य, संवेदनशीलता आणि कर्तव्यभावनेचा प्रेरणादायी संदेश पोहोचला.