मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध व अचूक शेतीविषयक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे पाणी फाउंडेशन आणि कोयटा फाउंडेशनच्या ‘स्मार्ट शेती’ ॲपचे लोकार्पण करण्यात आले.
हे स्मार्ट ‘पुश-बेस्ड’ ॲप शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची व पेरणीची तारीख नोंदवल्यानंतर पीक कॅलेंडरनुसार प्रत्येक शेतीकामाची योग्य वेळी नोटिफिकेशनद्वारे आठवण करून देणार आहे. त्यामुळे शेतीतील महत्त्वाच्या कामांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतकऱ्यांपर्यंत थेट शास्त्रशुद्ध आणि अचूक माहिती पोहोचवणारे हे एक प्रभावी डिजिटल माध्यम असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार समाधान आवताडे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.













