पंतप्रधान आवाससाठी ६८ लाभार्थ्यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत क्षेत्रात पंतप्रधान आवास योजना (२.०) राबविण्यात येत असून, या अंतर्गत शहरातील ६८ पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास २३ फेब्रुवारी रोजी मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीमुळे आता पात्र लाभार्थ्यांच्या हक्काच्या घरांच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे. नगरपंचायत कार्यालयाकडून बांधकामाबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात येणार आहेत.