Breaking News

महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये; वेळेत तपासणी अत्यावश्यक – नगराध्यक्ष संदेश पारकर

कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण आणि विज्ञानामुळे समाजाची प्रगती झाली असली तरी महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असे प्रतिपादन कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले. गुरुकृपा हॉस्पिटल व सरस्वती मेडिकल फाउंडेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सत्यविजय जाधव मित्रमंडळाच्या माध्यमातून आयोजित महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व प्रदर्शन साक्षरता अभियान कार्यक्रमात ते बोलत होते.

महिला कुटुंबाला न्याय देताना अनेकदा स्वतःवर अन्याय सहन करतात, ही वस्तुस्थिती आहे. महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता मोठ्या प्रमाणात आढळते, तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असल्याची चिंताजनक बाब त्यांनी व्यक्त केली.

या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन जि.प. सदस्या सुप्रिया मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर, जि.प. सदस्या सुप्रिया मेस्त्री, डॉ. प्रवीण बिरमोळे, डॉ. शमिता बिरमोळे, सत्यविजय जाधव, सुधीर ठाकूर, अशोक घाडीगांवकर, विकास गुरव, प्राची प्रविण परब (घरेलू कामगार महासंघ जिल्हाध्यक्ष व भा.म.सं. जिल्हा सहसचिव), श्री. आरेकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री. पारकर म्हणाले, महिलांनी वेळेत तपासणी केल्यास आजारांचे लवकर निदान होऊन योग्य उपचार घेता येतात. आरोग्याच्या बाबतीत सत्य लपवून चालत नाही. शासनाच्या विविध योजनांची जनजागृती अशा शिबिरांच्या माध्यमातून होत असून ग्रामीण भागातही अशी शिबिरे घेण्याची गरज आहे. यासाठी तालुका स्तरावर नगरपालिकेकडून आवश्यक ती मदत करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जि.प. सदस्या सुप्रिया मेस्त्री म्हणाल्या की, सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. लहान किशोरवयीन मुली असोत, तरुणी किंवा ज्येष्ठ महिला – प्रत्येक वयोगटातील महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, व्यायाम आणि वेळेवर उपचार गरजेचे आहेत. निरोगी महिला म्हणजे निरोगी कुटुंब आणि सक्षम समाजाची पायाभरणी होय. महिलांनी आरोग्याबाबत जागरूक राहून नियमित तपासणी करून घ्यावी आणि स्वतःच्या स्वास्थ्याची जबाबदारी स्वतः स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
या शिबिरात उपस्थित महिलांची हिमोग्लोबिन, मधुमेह, कर्करोग (कॅन्सर), रक्तदाब, रजोनिवृत्ती, प्रसूती व वंध्यत्व निवारण यासंबंधी मोफत तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांकडून आवश्यक सल्ला व मार्गदर्शनही देण्यात आले.
दरवर्षी ८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. मात्र महिलांचा आदर आणि सन्मान केवळ त्या एका दिवसापुरता मर्यादित न राहता तो वर्षभर कायम राहिला पाहिजे, असे मत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त केले. महिला कुटुंबासाठी योगदान देताना अनेकदा स्वतःच्या भावना आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांचा सातत्याने सन्मान होणे आवश्यक आहे. महिला दिनाच्या निमित्तानेच नव्हे, तर वर्षभर त्यांच्या कार्याचा गौरव आणि सन्मान राखला गेला, तरच खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.