खारेपाटण येथे लायन्स क्लब ऑफ बॉम्बे च्या वतीने १८ गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

प्रदीप पवार आणि हेमंत देवस्थळी यांच्या पुढाकाराने शैक्षणिक मदतीचा हात

खारेपाटण (प्रतिनिधी) : समाजसेवेचा वारसा जपत ‘लायन्स क्लब ऑफ बॉम्बे कांजूरमार्ग वेस्ट’च्या वतीने नुकताच एक स्तुत्य उपक्रम खारेपाटण हायस्कूल येथे राबविण्यात आला. यावेळी दुर्गम भागातील आणि गरजू विद्यार्थ्यांचा शालेय प्रवास सुकर व्हावा, या उद्देशाने शाळेतील १८ विद्यार्थ्यांना सायकलींचे मोफत वाटप नुकतेच खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या शुभहस्ते व लायन्स क्लबचे पदाधिकारी प्रदीप पवार आणि हेमंत देवस्थळी यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आला. अनेक विद्यार्थी घरापासून शाळा दूर असल्यामुळे पायी प्रवास करतात, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि ऊर्जा दोन्ही खर्च होते. ही गरज ओळखून प्रदीप पवार आणि हेमंत देवस्थळी यांनी पुढाकार घेतला आणि लायन्स क्लब ऑफ बॉम्बे च्या मदतीने उच्च दर्जाच्या १८ सायकलींची उपलब्धता येथील ग्रामीण विद्यार्थांना करून दिली. खारेपाटण हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या या छोटेखानी सोहळ्यात लाभार्थी विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते. सायकलींचे वाटप करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे. केवळ प्रवासाच्या साधनांअभावी कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, ही आमची भावना आहे. असे मत यावेळी

आयोजकांकडून व्यक्त करण्यात आले. या सायकली केवळ वाहन नसून विद्यार्थ्यांच्या प्रगतीची चाके आहेत.” या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित देवस्थळी यांचा प्रशालेच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तर सायकली मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी लायन्स क्लब तसेच पवार व देवस्थळी यांचे मनापासून आभार मानले. समाजातील इतर दानशूर व्यक्तींनीही अशा उपक्रमांसाठी पुढे यावे, असे आवाहन यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांचेकडून करण्यात आले. या कार्यक्रमाला खारेपाटण पं. स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, संचालक विजय देसाई खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे, प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेशक संतोष राऊत, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, तसेच शिक्षक, पालक आदी मान्यवर उपस्थित होते.