मद्यपी वाहन चालकांमुळे महामार्गावर अपघात
चालकांनी वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे
कणकवली (प्रतिनिधी) : महामार्गावर अनेकवेळा होणाऱ्या अपघातांमध्ये चालकाने मद्यसेवन केल्याने अपघात घडल्याचे समोर आले आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांना दिलेल्या आदेशानंतर महामार्ग पोलिसांनी मद्यसेवन केलेल्या चार वाहन चालकांवर कारवाई करत तब्बल ४० हजाराची दंडात्मक कारवाई केली.
महामार्ग पोलीस प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवस, पोलीस अंमलदार सुरेश बिर्जे, नितीन शेट्ये, रवी इंगळे, पांडुरंग खडपकर, सागर परब यांनी ही धडक मोहीम राबविली.
गेल्या आठवडाभराहून अधिक कालावधीत चार चालक मद्यसेवन करून वाहन चालवितांना आढळले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. न्यायालयात त्यांना प्रत्येकी दहा हजाराची दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक पाटील यांनी चालकांना वेगावर नियंत्रण ठेवून तसेच मद्यसेवन न करता महामार्गावर सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन केले असून अशी कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे.













