Breaking News

कणकवलीत पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव सुरू

कणकवली (प्रतिनिधी) : मागील अनेक दिवसांपासून थांबलेली अतिक्रमण हटाव मोहीम अखेर कणकवली नगरपंचायतीने शुक्रवारी पुन्हा एकदा सुरू केली आहे. कणकवली शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलाखालील जागेचे सुशोभीकरण करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिनी करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायतीची टीम मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली उड्डाणपुलाखाली दाखल झाली आहे. विशेषतः आप्पासाहेब पटवर्धन चौकात मोठ्या संख्येने भाजी, फळ, फुल विक्रेते तसेच अन्य स्टॉल धारक असतात. सद्यस्थितीत उड्डाणपुलाखाली भाजी, फळ, फुल विक्रेत्यांना बसण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र उर्वरीत स्टॉल धारकांना अद्याप तशी परवानगी दिलेली नाही. त्याच अनुषंगाने शहरातील पेट्रोल पंपासमोर उड्डाणपुलाखाली भाजी फळ, फुल विक्रेत्यांसाठी जागांची निश्चिती आता करण्यात येत आहे. या विक्रेत्यांना देऊन जागा शिल्लक राहिली तरच तेथे उर्वरित स्टॉल धारकांना आपले स्टॉल लावण्याची परवानगी देण्यात येईल, असे मुख्याधिकारी गौरी पाटील सध्या सर्व स्टॉल धरताना बजावत आहेत. एकूणच अतिक्रमण हटाव मोहीम वेग घेत असल्याचे दिसल्याने स्टॉलधारक धास्तावले आहेत. तर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.