वेंगुर्ला (प्रतिनिधी) : “पावसापासून संरक्षण, सेवाभावातून समर्पण” या ब्रीदवाक्याला साजेसा आदर्श प्रत्यक्ष कृतीतून साकारत महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांनी मळेवाड तिठा, शिरोडा बाजारपेठ आणि रेडी गणपती मंदिर परिसरात लहान व्यावसायिकांना व्यावसायिक छत्र्यांचे वाटप केले. पावसाच्या दिवसांत रोजीरोटी कमावणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांच्या अडचणी ओळखून त्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
पावसाळ्यात व्यापार सुरळीत सुरू ठेवण्यासाठी व्यावसायिक छत्री ही अनेक छोट्या व्यावसायिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब असते. हीच गरज लक्षात घेऊन विशाल परब यांनी व्यापाऱ्यांना संरक्षणाची आणि विश्वासाची छत्री उपलब्ध करून दिली. त्यांच्या या सेवाभावी उपक्रमामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलल्याचे पाहायला मिळाले.
विशेष म्हणजे, कोणतीही निवडणूक समोर नसताना केवळ सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याने त्याचे विशेष कौतुक होत आहे. प्रसिद्धीपेक्षा समाजहिताला प्राधान्य देत केलेले हे कार्य सामाजिक उत्तरदायित्वाचे उत्तम उदाहरण असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
“राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी असते,” हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. पावसाच्या प्रत्येक सरीसोबत व्यापाऱ्यांना आधाराची छत्री मिळाली आणि सेवाभावाच्या या कृतीने अनेकांच्या मनात आपलेपणाची ऊब निर्माण केली.













