कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठवणारे विधान करत केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी आज स्पष्ट इशारा दिला
“पालिका निवडणुकीत जर उद्धव ठाकरेंची आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र आली, तर आम्ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे शिवसेनेशी सर्व संबंध तोडून टाकू ! ” राणे यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना पुन्हा ताप आला आहे.
“राजन तेली हा काही नेता नाही, पदाधिकारी नाही. तो प्रतिष्ठीत नागरिक म्हणवतो, पण आधी तो स्वतः प्रतिष्ठीत आहे का, ते पाहावं! तो शहर विकास आघाडी काढणार म्हणतोय, पण ही केवळ प्रसिद्धी मिळवायची धडपड आहे.”
“मी विशाल परब याला मानत नाही. कोण तो विशाल? मोठा विचारवंत असल्यासारखं वागतोय ! त्याने भाजपवर किती टीका केली, ते सर्वांना माहित आहे. तो कुठेही भेटू दे, मी त्याला काय ते सांगेन आणि त्यावेळी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल,” असे राणेंनी टोला लगावला.
राणेंनी यावेळी स्पष्ट केले की, सिंधुदुर्गात भाजपा हा प्रमुख घटक आहे आणि कोणत्याही निवडणुकीत भाजपा कार्यकर्त्यांच्या सन्मानावर कुणी गदा आणू देणार नाही.
आम्ही सगळ्यांचा आदर करतो, पण कोणी भाजपचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करणार असेल, तर तो आम्ही सहन करणार नाही. आमचा सन्मान हा आमच्या कार्यकर्त्यांच्या रक्ताशी जोडलेला आहे,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
या विधानानंतर राजन तेली आणि विशाल परब यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. राणे यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटावरही निशाणा साधल्याने महायुतीतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे.
सिंधुदुर्गातील राजकारणात राणेंचा आवाज म्हणजे थेट वज्रनाद. त्यांनी पुन्हा एकदा “मी सांगतोय ते लक्षात ठेवा” या स्टाइलमध्ये केलेले हे विधान – आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकीय वातावरणात खळबळ उडवणार हे निश्चित !












