देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तालुक्यातील तोरसोळे पारवळवाडी येथे टाकलेल्या छाप्यात सुमारे ५ हजार ६२५ रुपये किमतीचा गोवा बनावटीचा अवैध दारुसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी तेथील सतीश गंगाराम परब (५०) या संशयिताविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ३ एप्रिलला दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास तोरसोळे पारवळ फाटा येथे छापा टाकून तेथील सुवर्णा जनरल स्टोअर्सच्या पाठीमागे असलेल्या आंबा- काजू बागेतून अवैध गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त केला. घटनेची फिर्याद स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार किरण देसाई यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिली. तपास हवालदार गणपती गावडे करत आहेत.












