कणकवलीत पहाटे चोरट्याचा धुमाकूळ

पोलीस ठाण्याजवळच सहा दुकाने फोडली

कणकवली (प्रतिनिधी) : शहरात शनिवारी पहाटेच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने धुमाकूळ घालत तब्बल सहा दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरच ही घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आचरा रोडवरील सना कॉम्प्लेक्समधील तीन दुकाने चोरट्याने फोडली. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या बेंगलोर अय्यंगार बेकरीच्या बाजूच्या राज मेडिकलसह आणखी तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी करण्यात आली. चोरट्याने अत्यंत शिताफीने ही चोरी केल्याचे दिसून येत असून परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही त्याने आपला डाव यशस्वीपणे साधला.
आचरा रोड हा कणकवलीतील अत्यंत वर्दळीचा मार्ग असून येथून काही अंतरावरच कणकवली पोलीस स्टेशन आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या अगदी जवळच अशा प्रकारे सलग चोरी होणे ही गंभीर बाब मानली जात आहे.
या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला याचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. दरम्यान, या प्रकरणी अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली तरी पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून चोरट्याचा शोध घ्यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.