परप्रांतीय LED पर्ससीन नौकेवर कारवाई; 20 खलाशांसह नौका जप्त

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाने परप्रांतीय LED पर्ससीन नौकेवर मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई दि. 04 एप्रिल 2026 रोजी पहाटे 3.45 वाजण्याच्या सुमारास निवती समोरील समुद्रात करण्यात आली.


मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी श्री. गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, वेंगुर्ला) तसेच सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी श्रीमती तेजस्विता करंगुटकर हे नियमित सागरी गस्त घालत असताना गोवा राज्यातील ‘जय IV बॉस’ (नोंदणी क्र. IND-GA-२-MM-3588) ही नौका महाराष्ट्राच्या जलसीमेत आवागमन करताना आढळून आली.

सदर नौकेचा पाठलाग करून ती थांबवण्यात आली. तपासणीदरम्यान नौकेवर आवश्यक विधीग्राह्य कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. पुढील तपासणीत नौकेवर अवैध व अनधिकृतरित्या LED मासेमारीचे साहित्य आढळून आले. या नौकेवर तांडेलसह एकूण 20 खलाशी असल्याची माहिती समोर आली.

यानंतर सदर नौका जप्त करण्यात येऊन सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. ही कारवाई सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक यांच्या सहकार्याने मा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. दरम्यान, अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी मा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण यांच्या न्यायालयात करण्यात येणार आहे.