कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कळसुली गावातील एका ओहोळ परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास एका पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. प्रारंभी मृतदेह अज्ञात असल्याची माहिती समोर येत होती; मात्र नंतर मृत व्यक्तीची ओळख शंकर अनंत कुडतरकर (वय ४८) अशी पटली आहे. मृतदेह पुरुष जातीचा असून अंगात फुल हाताचा शर्ट व ट्रॅक पॅण्ट असल्याचे दिसून आले.
शंकर कुडतरकर हे बांधकाम व्यवसायात मजुरीचे काम करत होते. कामानिमित्त ते विविध ठिकाणी जात असत व तेथेच काही काळ वास्तव्यास राहत असत. कुटुंबीयांच्या माहितीनुसार ते घरात स्वतंत्र राहत होते. त्यांच्या पश्चात वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. पत्नी व मुलगा सध्या त्यांच्यासोबत राहत नसल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही केली असून मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी अधिक तपास सुरू आहे. घटनेचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.













