भोंदूबाबा खरात प्रकरणात आमदार केसरकर अडचणीत? एसआयटी चौकशीपर्यंत राजीनाम्याची काँग्रेसची मागणी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचे नाव आणि त्यांच्यासोबतचे फोटो समोर आल्यामुळे सावंतवाडीच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून ही अत्यंत चिंताजनक व लाजिरवाणी बाब आहे, असा संतप्त आरोप काँग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांनी केला आहे.

गेल्या आठ दिवसांपासून अशोक खरात याचे भोंदूगिरी, स्त्रीलंपटपणा आणि गरिबांच्या जमिनी बळकावण्यासंदर्भातील अनेक व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या प्रकरणात त्याच्या निकटवर्तीयांमध्ये समाविष्ट असलेल्या रुपाली चाकणकर यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र, विविध वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व छायाचित्रांमध्ये आमदार दीपक केसरकर यांचे नाव वारंवार पुढे येत असल्याने सावंतवाडीवासीयांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

“राज्यातील २८८ आमदारांमध्ये सावंतवाडीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदाराचे नाव अशा वादग्रस्त प्रकरणात ‘खास भक्त’ म्हणून समोर येणे हे अत्यंत लज्जास्पद आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईपर्यंत आमदार केसरकर यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा,” अशी ठाम मागणी सौ. वंजारी यांनी केली.

याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री यांना प्रश्न विचारला की, या गंभीर प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करून राजीनामा घेण्यात येणार आहे का, की पुन्हा एखाद्या प्रकरणाप्रमाणे ‘क्लिनचीट’ दिली जाणार आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सावंतवाडी मतदारसंघातील विकासकामांबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “स्थानिक भागात निधी अपुरा असताना नाशिक व सिन्नर भागात रस्त्यांसाठी निधी वळवला जात असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. त्यामुळे सावंतवाडीकरांनी न्याय मागायचा तरी कुणाकडे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“निवडणुकांपर्यंत मतदारसंघात राहून नंतर दुर्लक्ष करणाऱ्या प्रवृत्तींकडून आणखी काय अपेक्षा ठेवायची?” असा उपरोधिक प्रश्न विचारत त्यांनी या प्रकरणाची तात्काळ एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली.

“आमदार केसरकर यांनी राजीनामा देऊन निष्पक्ष चौकशीला सामोरे जावे, अन्यथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही सौ. साक्षी वंजारी यांनी दिला.