सासोली येथे गवा रेड्याची चालत्या कारला जोरदार धडक; महिला गंभीर जखमी, कारचे मोठे नुकसान

दोडामार्ग (प्रतिनिधी) : सासोली येथील तिलारी कालव्या नजीक दोडामार्ग-बांदा मुख्य रस्त्यावर आज काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. चालत्या अल्टो कारवर गवा रेड्याने अचानक धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात गाडीचे देखील हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

दोडामार्ग हुन हे कुटुंब आपल्या अल्टो कारने मोरगाव) येथे जत्रेसाठी जात होते. सासोली परिसरातील तिलारी कालव्याजवळ गाडी आली असता, अचानक एका महाकाय गवा रेड्याने धावत्या गाडीवर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, गवा रेडा थेट गाडीच्या समोरच्या काचेवर आणि दरवाजावर आदळला. धडकेच्या प्रभावाने गवा रेडा शेजारील गटारात कोसळला, मात्र काही वेळातच तो तिथून उठून जंगलाच्या दिशेने पसार झाला.

या अपघातात गाडीच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला असून समोर बसलेल्या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच सासोली येथील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत रुग्णवाहिका बोलावली. जखमी महिलेला तातडीने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी महिलेचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.

दोडामार्ग-बांदा मार्गावर वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी अशा प्रकारे अपघात घडले होते त्यामुळे वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.