देवगड- जामसंडे न. पं. साठी कायमस्वरुपी मुख्याधिकारी मिळावा !

देवगड (प्रतिनिधी) : नगरपंचायतीसाठी देवगड-जामसंडे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करावा. कोर्ले-सातंडी नवीन नळपाणी योजना लवकरात लवकर करावी. तसेच रखडलेल्या आनंदवाडी प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन देवगड-जामसंडे शहर विकास समन्वय समितीच्यावतीने राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांना देण्यात आले. पालकमंत्री राणे यांनी सदर मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा केली.

देवगड-जामसंडे शहर विकास समन्वय समितीच्या शामल जोशी, अण्णा खवळे, सुधीर मांजरेकर, राजेंद्र मेस्त्री, राजेंद्र राणे, शरद लाड, स्वप्नील कुबल आदी सदस्यांनी पालकमंत्री राणे यांची सदिच्छा भेट घेऊन देवगड, जामसंडे शहरातील विविध विकासकामांबाबत चर्चा केली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यात शहराला प्रामुख्याने भेडसावणारी सांडपाणी गटार योजना, नवीन व जुने रस्ते दुरुस्ती, वॉर्ड नं. ११ मधील गटाराचे काम तातडीने मार्गी लावणे, शहराला सुसज्ज मच्छी मार्केट उपलब्ध करून देणे आदी विकासकामांकडे पालकमंत्री राणे यांचे समितीने लक्ष वेधले. राणे यांनी समितीच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्या कामाचे कौतुक केले.