जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत कणकवलीची दीक्षा चव्हाण ठरली ‘कॅरमक्वीन’

खुल्या कॅरम स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पटकावले विजेतेपद

सावंतवाडी (प्रतिनिधी) : भिरवंडे-कणकवली येथील दीक्षा नंदकिशोर चव्हाण हिने आपल्या जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत जिल्हास्तरीय खुल्या कॅरम स्पर्धेचे विजेतेपद सलग दुसऱ्यांदा पटकावले. सिंधुदुर्गच्या कॅरम इतिहासात पहिल्यांदाच खुल्या गटाचा अंतिम सामना दोन महिला खेळाडूंमध्ये रंगला, ज्यामध्ये दीक्षाने बाजी मारत कॅरम प्रेमींचे लक्ष वेधून घेतले.

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पुरस्कृत, सावंतवाडी नगरपरिषद पर्यटन व उद्यान सभापती सौ. मोहिनी मडगावकर यांच्या संकल्पनेतून आणि सचिन घाडी मित्रमंडळ सावंतवाडी यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने २ व ३ मे रोजी काझी शहाबुद्दीन हॉल येथे ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन सौ. मोहिनी मडगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, केतन आजगावकर, सुकन्या टोपले, शुक्राचार्य महाडेश्वर, योगेश फणसळकर, सचिन घाडी, राजेश निर्गुण आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सर्व ६४ स्पर्धकांना विशेष टी-शर्ट्सचे वाटप करण्यात आले.

अटीतटीच्या लढती स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दीक्षा चव्हाण, सचिन घाडी, तजमुल मकानदार, डॉ. अनिल तायशेटे, केशर निर्गुण, प्रतीक बांदेकर आणि सागर ढवळ यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत उपउपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या दिवशी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत दीक्षाने अनुभवी सचिन घाडीला, तर तजमुल मकानदारने अनिल तायशेटे यांना पराभूत केले.

उपांत्य फेरीत केशर निर्गुण विरुद्ध सागर ढवळ आणि दीक्षा चव्हाण विरुद्ध तजमुल मकानदार असे सामने झाले. यातून केशर आणि दीक्षा यांनी अंतिम फेरीत धडक मारली. दोन्ही खेळाडू राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व करत असल्याने अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला.

अंतिम थरार अंतिम सामन्यात केशरने पहिल्या सेटमध्ये विजय मिळवला, तर दुसऱ्या सेटमध्ये दीक्षाने पुनरागमन केले. निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये केशरने ९-० अशी भक्कम आघाडी घेतली होती. मात्र, दीक्षाने जिद्दीने खेळ करत ही पिछाडी भरून काढली आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले.

पारितोषिक वितरण शिवसेना जिल्हाप्रमुख व नगरसेवक संजू परब आणि सौ. मोहिनी मडगावकर यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. पहिल्या ८ विजेत्यांना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. सलग तीन स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचून दोन वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या दीक्षा चव्हाणवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.