अमली पदार्थांविरोधात संयुक्त कारवाईचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अमली पदार्थाचे समुळ उच्चाटन होण्याचे दृष्टीने सर्व विभागांनी पोलीस विभागासोबत एकत्रितरित्या कामकाज करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी, मच्छिंद्र सुकटे यांनी सूचना दिल्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेली अमली पदार्थांची विक्री, वाहतूक, सेवन याबाबत गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती काढून अमली पदार्थ संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावेत.

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भातील मासिक बैठक निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन उपस्थित होते.

तसेच अशाप्रकारचे बेकादेशीर कृत्य करणाऱ्यांवर प्रतिबंध करण्यासाठी, शाळा, कॉलेज व इतर शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अमली पदार्थांचे सेवन, विक्री होत असल्यास त्या दृष्टीने कारवाई करण्यासाठी संबंधित विभागांना आदेशित केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुख्यत्वे लगतचे गोवा राज्य आहे. त्या राज्यातून शिरोडा, वेळागर याठिकाणी परदेशी नागरिक मोटारसायकल किंवा बोटीद्वारे प्रवास करीत असतात. त्यांच्याकडून अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री व सेवन होत आहे. त्यामुळे त्यादृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व विभागांनी मिळून जनजागृती अभियान हाती घेऊन अमली पदार्थाचे समूळ उच्चाटन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व विभागांना सूचना श्री. सुकटे यांनी दिल्या आहेत.