तळेरे (स्वप्नील तांबे) : कणकवली तालुक्यातील ओझरम ग्रामपंचायत हद्दीतील कोनगेवाडीकडे जाणाऱ्या वैयक्तिक रस्त्यावरून होणाऱ्या अतिजड वाहतुकीला अखेर ग्रामस्थांनी पूर्णविराम दिला आहे. स्थानिक जमीन मालकांनी रहिवाशांच्या ये-जा करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या या रस्त्याचा वापर डंपर आणि जड वाहनांसाठी होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती.
वारंवार सूचना देऊनही परिस्थितीत सुधारणा न झाल्यामुळे ओझरम ग्रामस्थांनी एकत्र येत या मार्गावर अतिजड वाहतुकीसाठी बंदी घालण्याचा ठोस निर्णय घेतला. गावातील रस्त्यांचे संरक्षण, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता तसेच बागायती शेतीचे संवर्धन या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या वेळी सरपंच समृद्धी राणे, माजी सभापती विनायक राणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष सदाशिव राणे, माजी सरपंच प्रदीप राणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी संबंधित ठिकाणी फलक लावून अवजड वाहतुकीस अधिकृतपणे बंदी घातली.
दरम्यान, ८ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या शाश्वत ग्रामसभेतील ठराव क्रमांक २/१ नुसार, कोनगेवाडी परिसरात ट्रक, डंपर आणि मोठ्या मशिनच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. शेती किंवा अत्यावश्यक कारणांशिवाय कोणत्याही जड वाहतुकीस सक्त मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ५३ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सरपंचांनी दिला आहे.














