विद्याविहार येथील के जे सोमैया कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे संपन्न होईल परिषद
खारेपाटण (संतोष पाटणकर ) : रस्त्यावरील निराधार वंचित बांधवांचे पुनर्वसन आणि त्यांना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन मिळण्यासाठी जीवन आनंद संस्था मुंबई,पालघर, सिंधुदुर्ग सह गोवा राज्यात संस्थेच्या आश्रम, शेल्टर होम द्वारे कार्यरत आहे. जीवन आनंद संस्था आणि मुंबईतील प्रतिथयश शैक्षणिक संस्था के. जे. सोमैया कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स,विद्याविहार यांच्या संयुक्त विद्यमाने “रस्त्यावर राहणाऱ्या वंचित बालकांचे प्रश्न व आव्हाने” या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर दि.२० जून २०२६ रोजी एक दिवशीय राज्य स्तरीय परिषदेचे आयोजन सोमैया महाविद्यालय,विद्याविहार येथे करण्यात आले आहे.
समाजातील सर्वाधिक दुर्लक्षित आणि असुरक्षित घटक असलेल्या रस्त्यावरील बालकांच्या जीवनमान,शिक्षण,आरोग्य, संरक्षण,पुनर्वसन आणि सन्मानपूर्वक जीवनाच्या संधी यांविषयी विविध स्तरांवर चर्चा घडवून आणणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब आणि के. जे. सोमैया कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स चे प्राचार्य किशन पवार हे या परिषदेचे प्रमुख संयोजक आहेत. जीवन आनंद संस्था, सोमैया कॉलेज व एन एस एस युनिट च्या प्रमुख सहभागातून ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
समाजातील निराधार वंचित बांधवांसाठी आश्रम,शेल्टर, संस्थांच्या माध्यमातून कार्य करणारे मान्यवर ममता सिंधुताई सकपाळ, एन एस एस चे जिल्हा समन्वयक, मुंबई उपनगर झोन-3 चे निखिल कारखानीस, मुंबई जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार, सलाम बालक ट्रस्टच्या अध्यक्ष व संस्थापक विश्वस्त झरीन गुप्ता,बाल हक्क कार्यकर्ते आणि विद्यायक भारतीचे संस्थापक संतोष शिंदे,राज्य बाल हक्क आयोग निवड समितीचे सदस्य विकास सावंत,बाल कल्याण समिती-मुंबई चे माजी अध्यक्ष व सलाम बालक ट्रस्ट चे संचालक मिलिंद बिडवई हे मान्यवर या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.तसेच या परिषदेत निराधार,वंचितांसाठी कार्य करणार्या स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी,कार्यकर्ते,विद्यार्थी, संशोधक,शासन अधिकारी यांचा प्रमुख सहभाग असणार आहे.
सदर परिषद विद्याविहार येथील के जे सोमैया कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स,विद्याविहार (पूर्व), मुंबई येथे स.९.०० ते सायं. ५.३० या वेळेत संपन्न होणार असल्याची माहिती या परिषदेचे निमंत्रक व सह निमंत्रक, एन एस एस प्रकल्प अधिकारी प्रा.अमोल भोसले व प्रा.दिपाली तोरसकर यांनी दिली.












