कणकवलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; ३ पंप बंद, सीएनजीसाठी वाहनांच्या लांब रांगा

कणकवली (प्रतिनिधी) : शहरात अचानक पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. टँकर वेळेत न आल्यामुळे शहरातील तब्बल तीन पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ आली असून, बसस्टँड, पोलीस ठाणे आणि वागदे परिसरातील पंप पूर्णपणे बंद आहेत.
दरम्यान, इंधन उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचा ओढा सीएनजीकडे वाढला आहे. परिणामी सीएनजी पंपांवर रिक्षा व कारची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.
काल दुपारपासूनच काही पंपांवर पेट्रोल संपल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. अचानक उद्भवलेल्या या तुटवड्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वाहनचालकांना इंधन न मिळाल्याने रिकाम्या हाताने परत फिरावे लागत असून, काहींना पर्यायी पंपांचा शोध घ्यावा लागत आहे.
दरम्यान, इंधन टंचाईमागे पुरवठा साखळीतील अडथळे कारणीभूत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित यंत्रणेकडून लवकरात लवकर पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे.